निसर्ग चक्री वादळा मुळे महावितरणला कल्याण परिमंडळात सव्वा कोटींचे नुकसान १६८ विजेचे खांब ३२२ किलोमीटर वीजवाहिन्या जमीनदोस्त

डोंबिवली – अतितीव्र निसर्ग चक्री वादळाचा तडाखा महावितरणच्या कल्याण परिमंडळाला बसला असून सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे १६८ विजेचे खांब, ८ रोहित्र व ३२ किलोमीटर वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्या आहेत. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करून जवळपास सर्व भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

कल्याण मंडल एक कार्यालयांतर्गत डोंबिवली, कल्याण पूर्व आणि पश्चिम भागात उच्चदाब वाहिनीचे ८ खांब व ८किलोमीटर वीजतारा, लघुदाब वाहिनीचे ८ खांब व ५.३ किलोमीटर वीजतारा जमीनदोस्त झाल्या व ७ रोहित्र नादुरुस्त झाले. कल्याण मंडल कार्यालयांतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, टिटवाळा तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उच्चदाबाचे ४५ खांब व ८ किलोमीटर वीजतारा तसेच लघुदाब वाहिनीचे ७८ खांब व ७ किलोमीटर वीजतारा तसेच ८ रोहित्र कोसळण्यासोबतच १० रोहित्र नादुरुस्त झाले. वसई मंडल कार्यालयांतर्गत वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे भागात उच्चदाब वाहिनीचे ५ खांब व १.२ .किलोमीटर वीजवाहिन्या तसेच लघुदाब वाहिनीचे २३ खांब व ३ किलोमीटर वीजवाहिन्या पडल्या असून ११ रोहित्र नादुरुस्त झाले. पालघर मंडल कार्यालयांतर्गत पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, बोईसर भागात लघुदाब वाहिनीचा एक खांब व ०.२ किलोमीटर वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्या असून २ रोहित्र नादुरुस्त झाले. याशिवाय परिमंडलात सव्वा किलोमीटर भूमिगत वीजवाहिन्या नादुरुस्त झाल्या. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून जवळपास सर्व भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.आपत्तीच्या या काळात मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदाराचे कामगार फिल्डवर राहून अथक काम करीत होते. त्यामुळे अडचणीच्या काळातही कमी कालावधीत वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य झाले.

    
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web