फेम इंडिया’ व ‘एशिया पोस्ट’च्या सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची निवड

प्रतिनिधी.

अमरावती – फेम इंडिया’ व ‘एशिया पोस्ट’च्या वतीने देशभर 724 जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरीसाठी 50 जिल्हाधिका-यांची निवड करण्यात आली असून, त्यात अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा समावेश आहे.
याबाबत ‘फेम इंडिया’ या नियतकालिकाने निवड केलेल्या 50 जिल्हाधिका-यांची सूची प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, विकासासाठी योजनांच्या रचनेपासून ते अंमलबजावणीपर्यंत विविध कामांमध्ये जिल्हाधिका-यांचा सहभाग असतो. जिल्ह्यातील उपलब्ध साधनसामग्री, मनुष्यबळ, शासन निर्णय, विविध भागांची गरज आदींचा विचार अंमलबजावणी करताना केला जातो. सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही योजनेच्या क्रियान्वयनात जिल्हाधिका-यांची भूमिका व योगदान महत्वपूर्ण असते.
प्रशासकीय कामांमध्ये अनेकदा अडचणीही येऊ शकतात. मात्र, त्यावर मात करत समग्र जिल्ह्याचा विचार करून, तसेच सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून विकासाला गती देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्या दृष्टीने प्रशासनाबद्दलची काहीशी रूढ नकारात्मकता टाळणे व सकारात्मकता निर्माण होण्याच्या हेतूने, तसेच आव्हानात्मक परिस्थितीचा सतत सामना करून विकासकार्य पुढे नेणा-या प्रशासकांना प्रोत्साहन देणे, त्यांचे मनोबल उंचावणे आवश्यक असते. याच हेतूने देशभर हे सर्वेक्षण करण्यात आले, असे ‘फेम इंडिया’ने नमूद केले आहे.
देशातील 724 जिल्ह्यात हे सर्वेक्षण करताना उत्कृष्ट प्रशासन, दूरदृष्टी, उत्कृष्ट विचारसरणी, जबाबदारीने काम पूर्णत्वास नेण्याची शैली, निर्णयक्षमता, गांभीर्य आणि कार्यकुशलता आदी निकष ठरविण्यात आले होते. देशातील 50 उत्कृष्ट जिल्हाधिका-यांत निवड झाल्याबद्दल श्री. नवाल यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
श्री. नवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2010 च्या बॅचचे अधिकारी असून, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आहेत. त्यांनी यापूर्वी डहाणू येथे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक, अहमदनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना उत्कृष्ट काम आणि नवनवीन संकल्पना राबविल्याबद्दल 2017 -18 या वर्षांसाठी श्री. नवाल यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. महिला बचत गट आणि शेतकऱ्यांना विविध लघु उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहित करून रोजगार निर्मिती, नागरिकांच्या अडचणींच्या तत्काळ निराकरणासाठी संवाद कक्षासह विविध ऑनलाईन सेवांवर भर आदी अनेक वैविध्यपूर्ण कामे त्यांनी केली आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web