अचलपूरमध्ये बीओटी तत्वावर १ हजार घरकुले साकारणार – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

प्रतिनिधी .

अमरावती – गोरगरीब, गरजू व्यक्तींना हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध आवास योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांतून परतवाडा-अचलपूर हे जुळे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने बीओटी तत्वावर एक हजार घरकुले साकारण्याचा निर्णय जलसंपदा, कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला. या दृष्टीने आवश्यक निधी व इतर प्रक्रिया तत्काळ पाठपुरावा करून पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिले.
अचलपूर येथील विश्रामभवन येथे राज्यमंत्री श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली शहर प्रशासनाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शहराच्या नगराध्यक्षा सुनीता फिस्के, मुख्याधिकारी आश्विनी वाघमळे, बांधकाम सभापती संजय तट्टे, बंटी कंकरानिया, प्रवीण पाटील, विजय थावानी, रुपेश लहाने, नरेंद्र फिस्के, बंटी उपाध्याय यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत परतवाडा-अचलपूर या जुळया शहरातील पाणी पुरवठा, प्रधानमंत्री आवास योजना, नगरपालिका भवन, आठवडी बाजार आदींसंदर्भात आढावा राज्यमंत्री श्री. कडू यांनी घेतला. नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी सर्व नागरी पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर सर्व आवास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. जुळ्या शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने एक हजार घरकुलांची उपाययोजना तत्काळ पूर्णत्वास जाईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा प्रलंबित दुसरा व तिसरा हप्ता देण्यासाठी नगरपालिकेला निधीची तरतूद उपलब्ध करुन दिली जाईल. ही कामे गतीने करावी. निधीची कमतरता पडू देणार नाही. योजनेत पीआर कार्ड वडलांच्या नावाने असलेल्या व लाभार्थी अर्जदार मुलगा असलेल्या एकूण 220 घरकुलांच्या प्रकरणांना तत्काळ मंजूरी प्रदान करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
परतवाडा व अचलपूर या जुळ्या शहरात पाणीपुरवठ्यासाठी पूरक जलसंचय स्त्रोत उपलब्ध असताना मागील दोन महिन्यांपासून पाणी टंचाई असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुनियोजित उपायांची तत्काळ अंमलबजावणी करावी. येत्या एक महिन्याचा पाणीटंचाईचा प्रश्न दूर होऊन पाणीपुरवठा नियमित झाला पाहिजे, असे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले.
शहरातील साप्ताहिक बाजार, नगरपालिका भवन आदींबाबतही चर्चा यावेळी झाली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web