विभागीय आयुक्त संजीव कुमार यांचा कोरोना संसर्गाबाबत आढावा मान्सुनपुर्व तयारीची केली चर्चा

प्रतिनिधी.

गडचिरोली : नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी गडचिरोली येथे भेट देवून कोरोना संसर्गाबाबत जिल्हास्तरीय तयारीबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व यंत्रणांच्या प्रमुखांशी संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कामांबाबत प्रत्यक्ष चर्चा केली. यावेळी त्यांच्याबरोबर अतिरीक्त विभागीय आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते. संजीवकुमार यांनी या बैठकीत संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या स्थितीचा आढावा घेवून महसूल, आरोग्य व पोलीस यंत्रणेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्यासह पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, उपविभागीय अधिकारी राहूल गुप्ता, मनोज जिंदाल, डॉ.अनिल रूडे, डॉ.शशिकांत शंभरकर, डॉ.विनोद मशाखेत्री यांचे सह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत विभागीय आयुक्तांनी प्रत्येक गावात विविध आरोग्य विषयक लक्षणे अढळणाऱ्या लोकांची माहिती एकत्रित करण्यासाठी तसेच नव्याने येणाऱ्या लोकांची माहिती घेणेबाबत यंत्रणा तयार करा अशा सूचना दिल्या. दर दिवशी प्रत्येक ठिकाणाहून माहिती वेळेत संकलित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यामूळे प्रशासनाला संभावित रूग्ण शोधण्यास मदत होईल व संसर्ग साखळीही आपणाला वेळेत ब्रेक करता येईल असे ते म्हणाले. ६० वर्षांपेक्षा जास्त वृद्धांना या संसर्गापासून धोका जास्त आहे. त्यामूळे त्या वयोगटावर लक्ष केंद्रीत करून त्यांना अकारण बाहेर पडू देण्यास मज्जाव करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सर्वसाधारण तीन ते चार महिन्यानंतरची स्थिती काय असू शकेल याचा अंदाज घेवून त्यानूसारच आज नियोजनाला सुरूवात करावी अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिल्या. जिल्हयातील डायबेटीक रूग्ण, हायपर टेंशन रूग्ण, रक्तदाबाचे रूग्ण यांची माहिती अद्ययावत करून त्यांनाही आवश्यक सूचना द्याव्यात. तसेच आपणाला कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूदर जिल्हयात निरंक ठेवण्यासाठी तातडीने सेवा द्या असे ते म्हणाले.
या बैठकीत विभागीय आयुक्त यांनी पावसाळयापूर्व केलेल्या तयारीबाबतही आढावा घेतला. आवश्यक अन्नधान्य पूरवठा, आरोग्य विषयक साहित्य, बोटींची व्यवस्था तसेच आवश्यक मनूष्यबळ यावर त्यांनी चर्चा केली. जिल्हयातील जास्त पावसामूळे संपर्क तूटणाऱ्या गावांमध्ये घट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. बैठकीत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी विभागीय आयुक्तांना जिल्हयातील तयारी बाबत सादरीकरण दिले. तर पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या विभागांची माहिती त्यांना सादर केली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web