लॉकडाऊन काळात उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

प्रतिनिधी.

नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा, कळमेश्वर, बुटीबोरी, उमरेड येथील उद्योगांमधील मजूर मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना सामावून घेण्यासाठी उद्योजकांकडून नेमकी मागणी घ्यावी, त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

कोविड-१९, लॉकडाऊन आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी जिल्हास्तरीय आढावा घेतला.

सद्यस्थितीत नागपूर शहरातील वैद्यकीय यंत्रणा कोविड लढ्यात व्यस्त आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण भागात उद्भवणारी रोगराई आणि कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता स्वतंत्र आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी तसेच नागरिकांना याबाबत आवश्यक माहिती मराठीमध्ये सोप्या शब्दात प्रसारित करून कोविड आणि पावसाळ्यात घ्यावयाची खबरदारी या बाबत मागर्दर्शक सूचना प्रसारित कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

ताप, सर्दी, खोकला तसेच साथीच्या रोगांकरिता शहरातील मनपाचे दवाखाने सज्ज करा, कोविड रुग्णांसाठी खाजगी हॉस्पिटल सोबत समन्वय साधून त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना डॉ.राऊत यांनी अधिष्ठाता मेयो-मेडिकल आणि आयुक्त मनपा यांना दिले.

बैठकीत प्रामुख्याने विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, आयुक्त मनपा तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला, अधिष्ठाता मेयो अजय केवलीया, मेडिकल सजल मित्रा, सह संचालक उद्योग धर्माधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web