संपर्क शोधाचा कालावधी कमीत कमी करा- पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

प्रतिनिधी .

अकोला – अकोला जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सुसूत्रपद्धतीने उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तिंचा शोध घेण्याचा कालावधी हा कमीत कमी करावा, निकट संपर्कातील व्यक्तिंना क्वारंटाईन करावे तसेच उच्च धोका व कमी धोका असणाऱ्या व्यक्तींनाही अलग अलग ठेवावे असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी आज तातडीने जिल्ह्याला भेट दिली. यासंदर्भात आज सकाळी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. श्यामसुंदर शिरसाम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांनी पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांच्या तपासण्या व अन्य प्रक्रियांबाबत तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील बंदोबस्त उपाययोजनांबाबत माहिती दिली. त्यावर ना. कडू यांनी निर्देश दिले की, जेथे जेथे रेड झोन असतील तेथे आणखी दाट वस्ती असलेला भाग मार्क करा. तसेच पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांना एका तासाच्या आत क्वारंटाईन करा. तसेच संपर्क शोधाचा कालावधी कमी करा. जोखमीच्या स्तरानुसार सुद्धा रुग्ण वेगवेगळे ठेवा असे निर्देश दिले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच कोविड केअर सेंटर तयार केलेल्या ठिकाणाच्या आतील व्यवस्थांवर व्हिडीओ निरीक्षण ठेवा. तसेच अति संवेदनशील भागात ड्रोनचा वापर करुन निरीक्षण ठेवता येईल, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी कोरोना श्रृंखला तोडण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबद्दल चर्चा करण्यात आली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web