गृहमंत्र्यांनी वाढविले पोलिसाचे मनोबल राज्य राखीव दलाशी साधला संवाद

प्रतिनिधी.

मुंबई – जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपली तब्येत एकदम ठणठणीत करा आणि मग त्यानंतर कोरोना विरुद्धच्या लढाईत सामील व्हा. कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच आहोत. राज्याचे गृह मंत्रालय आणि संपूर्ण महाराष्ट्र शासन आपल्या पाठीशी आहे. अशा शब्दात राज्य राखीव दलाच्या सर्व गटांशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हीडीओ काँन्फरन्सद्वारे संवाद साधला.

यावेळी श्रीमती अर्चना त्यागी, अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल,  बी. जी. शेखर, पोलीस उपमहानिरीक्षक (मुख्यालय), महेश घुर्ये, पोलिस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, नागपूर परिक्षेत्र, नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे परिक्षेत्र व १० समादेशक हे सहभागी होते.

महाराष्ट्रातील कोरोना आजाराचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई शहर, मालेगाव, ठाणे शहर,  पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड,  अहमदनगर, नागपूर, नाशिक ग्रामीण, औरंगाबाद या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बलाच्या एकूण ५९ कंपन्या कोरोना प्रभावित क्षेत्रामध्ये बंदोबस्तास नेमणुकीस आहेत. या सर्व जवानांचे मनोबल वाढावे. शासन त्यांच्यासोबत आहे याची जाणीव त्यांना व्हावी तसेच त्यांच्या अडीअडचणी बाबत चर्चा होऊन त्याचे निराकरण व्हावे याकरिता गृहमंत्र्यांनी आज हा संवाद साधला.

सदर बंदोबस्तादरम्यान कोरोना आजाराने संसर्गित झालेले सध्या १६५ पोलीस कर्मचारी विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तसेच २१४ पोलीस कर्मचारी पूर्ण बरे झाले आहेत व १६६ पोलीस कर्मचारी नवीन निकषानुसार सोडण्यात आले आहेत. एकूण कोरोनाग्रस्त जवानांच्या ७०% जवान आतापर्यंत बरे झाले आहेत. जे जवान खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा उपचार घेत आहेत. त्यांना तातडीने वेलफेअर फंडातून एक लाख रुपये देण्यात येत आहेत.राज्य राखीव पोलीस बलाच्या सर्व केंद्रावर जवानांसाठी ऑक्सी मीटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याद्वारे जवानांचे ऑक्सिजन लेवलची तपासणी होऊ शकेल, अशी माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.

गृहमंत्र्यांनी राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या जवानांची देखील संवाद साधून त्यांची विचारपूस केली. त्यांना मिळत असलेले औषध उपचार, तेथील सुविधा याबाबत सविस्तर माहिती घेतली. उपचार सुरु असलेल्या जवानांनी त्यांना उत्तम सुविधा व औषध उपचार मिळत असल्याचे व त्याबद्दल ते समाधानी असल्याचे गृहमंत्र्यांना सांगितले. तसेच उपचार घेऊन कोरोना आजाराच्या संसर्गातून मुक्त झालेले ३ पोलिस अधिकारी व ३५ पोलिस कर्मचारी तसेच गट मुख्यालयात विलगीकरण कक्षात असलेल्या ६५  पोलीस कर्मचारी यांच्याशी देखील गृहमंत्र्यांनी ऑनलाईन संबोधन केले.  सर्व केंद्रातील पोलीस जवानांच्या  कुटुंबीयांनी  बचत गटाच्या माध्यमातून  मास्क व  सॅनिटायझरची निर्मिती केली असून ते मास्क स्थलांतरित मजुरांसाठी देण्यात आले. त्याचेही गृहमंत्र्यांनी कौतुक केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web