रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य द्या जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

प्रतिनिधी.

यवतमाळ – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. मात्र यात शिथिलता मिळाल्यामुळे विविध ठिकाणी अडकलेले मजूर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात परत आले आहेत. दैनंदिन उदरनिर्वाह करण्यासाठी या मजुरांना आता कामाची गरज आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य देऊन ‘मागेल त्याला काम’ या प्रमाणे प्रत्येकाला काम उपलब्ध करून द्यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिल्या.
नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात जवळपास 66 हजार लोक बाहेरून आले आहेत. यात मजुरांचाही समावेश आहे. या मजुरांना तहसीलदार आणि गटविकास अधिका-यांनी जॉब कार्ड उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान दहा कामे सुरू केली तर जवळपास 12 हजार कामे सुरू होऊ शकतात. त्यामुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होईल. नरेगाच्या कामांना मजुरांची कमतरता नसून कामाबाबत अधिका-यांनी योग्य नियोजन करावे. कृषी विभागाचा आढावा घेतांना ते म्हणाले, बोगस बियाणे साठवणूक, त्याची वाहतूक व विक्री यावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिका-यांनी विशेष लक्ष द्यावे.
इतर राज्यात मान्यता असलेल्या बियाणांना आपल्या राज्यात बंदी आहे. अशा बियाणांची विक्री होऊ देऊ नये. तसेच जास्त दराणे बियाणे विक्री, अनधिकृत बियाणे आणि खतांच्या विक्रीवर गांभीर्याने लक्ष द्या. दोन वर्षांपूर्वी किटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यातील शेतकरी / शेतमजुर यांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे सुरक्षा किट वापराबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती करा. तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी याप्रकरणी समन्वय ठेवून काम करावे. गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजनेची प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
यावेळी त्यांनी कोव्हीड – 19, कृषी, कापूस खरेदी, मग्रारोहयो आदी विषयांचा आढावा घेतला. तत्पूर्वी डॉ. विजय डोंबाळे यांनी कोव्हीडबाबत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी कोरोना संदर्भातील उपाययोजना, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पराग मगर यांनी पिकांवर टोळ धाड याबाबत सादरीकरण केले.
बैठकीला उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगिता राठोड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web