ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग

मुंबई – राज्यात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये टोळधाडीचे आक्रमण झाले असून कृषि विभागामार्फत किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. ड्रोनच्याही माध्यमातून या टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याबाबत प्रयोग करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले. मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नसल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, दि. २४ मेच्या सुमारास मध्यप्रदेशातून महाराष्ट्रातील अमरावतीच्या काही भागात हे कीटक आले. अग्निशमन दलाच्या बंबांच्या माध्यमातून तसेच कीटकनाशक फवारणी यंत्राच्या सहाय्याने त्यांच्यावर फवारणी करून ५० टक्क्यांपेक्षा जास्त नायनाट झाल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले आहे. या किटकांवर फवारणी करण्यासाठी लागणारे कीटकनाशक प्रादुर्भाव असलेल्या भागातील शेतकऱ्यांना कृषि विभागामार्फत मोफत पुरविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नाही. काल यासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्या भागाचा उल्लेख होता तेथे ठाणे विभागाचे कृषि सहसंचालक विकास पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तेथे टोळधाडीचे आक्रमण झाले नसल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. मात्र गुजरातकडील भागातून या किटकांचे आक्रमण होऊ शकते ही शक्यता गृहीत धरून पालघर आणि गुजरात सीमेलगतच्या भागातील शेतकरी बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचे सह संचालक पाटील यांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, मोर्शी, वरूड या तालुक्यातील काही भागात टोळधाड येऊन गेल्याचे निष्पन्न झाले असून तेथील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. टोळधाडीपासून शेतीपिकाचे नुकसान टाळण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना दिवसा प्रामुख्याने पत्र्याचे डबे वाजविणे, ट्रॅक्टर, मोटर सायकलचे सायलेन्सर काढून मोठा आवाज करून किडीला हुसकावून लावणे आदी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सायंकाळी ज्या क्षेत्रात कीड झाडावर विसावली आहे त्याबाबत कृषी विभागाला माहिती देऊन त्या किडीवर किटकनाशकांची फवारणी करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल, रामटेक या भागात टोळधाडीचा काहीसा प्रादुर्भाव जाणवला असून त्यावर कृषी विभागामार्फत उपाययोजना केल्या आहेत, असे सहसंचालक रवींद्र भोसले यांनी सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web