१६ तालुक्यात मोबाईल फिवर क्लिनीक सुरू

प्रतिनिधी .

यवतमाळ – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आता शहरातून ग्रामीण भागातही पसरू लागला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे हा प्रादुर्भाव इतर नागरिकांना होऊ नये म्हणून प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या संकल्पनेतून गावागावात नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यासाठी मोबाईल फिवर क्लिनीक सुरू करण्यात आले आहे.
मोबाईल फिवर क्लिनीक म्हणजे चाकावरील फिरता दवाखाना असून 16 तालुक्यात मोबाईल व्हॅनद्वारे नागरिकांची तपासणी व त्वरीत उपचार असा याचा उद्देश आहे. या वाहनात एक डॉक्टर, एक आरोग्य सेवक / सेविका, एक औषध निर्माण अधिकारी अशा तीन सदस्यांचा समावेश आहे. सोबतच मोबाईल व्हॅनमध्ये अत्याधुनिक इंफ्रारेड थर्मामीटर, पल्स ऑक्सीमीटर तसेच सर्व प्रकारची औषधी उपलब्ध राहील.
यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडून प्रति तालुका एक याप्रमाणे स्कलू बस अधिग्रहीत करण्यात आली आहे. या मोबाईल व्हॅनमध्ये इतर सर्व बाबी आरोग्य विभागाच्या आहेत. वाहनांवर जीपीआरएस प्रणाली लावण्यात आली असून तालुक्यातील सर्व गावे समाविष्ठ करण्यासाठी मार्गक्रमण आराखडा (रुट प्लान) आखण्यात आला आहे. ज्या गावात मोबाईल व्हॅन जाणार आहे तेथे एक दिवस पूर्वी दवंडी देऊन व स्थळ सांगून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येईल. सदर मोबाईल व्हॅन ठरलेल्या दिवशी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणात आरोग्य चमु घेऊन रवाना होईल. यात गावातील नागरिकांचे खोकला, ताप, श्वसनाचे आजार तसेच इतर लक्षणे तपासून आवश्यकतेनुसार तेथेच उपचार करण्यात येईल.
लक्षणे पाहून ज्या रुग्णांना इतरत्र पाठविण्याची गरज आहे त्यांना यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवून त्यांच्यावर उपचार होणार आहे. एवढेच नाही तर ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आहे अशा नागरिकांनासुध्दा मार्गदर्शन करण्यात येईल. मोबाईल फिवर क्लिनीकमुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे ताप, खोकला, श्वसनाचा त्रास आदींचे निदान होण्यास मदत होईल. तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास संबंधितांची तात्काळ माहिती व उपचार देण्याचे काम होणार आहे.
विशेष म्हणजे या मोबाईल फिवर क्लिनीक दैनंदिन भेटीचा, तपासणी व उपचाराचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत रोज सायंकाळी घेण्यात येतो. गावात मोबाईल फिवर क्लिनीक आल्यानंतर नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

आतापर्यंत 16 तालुक्यातील 326 गावांमध्ये मोबाईल फिवर क्लिनिकद्वारे तपासणी करण्यात आली आहे. यात एकूण 4554 नागरिकांची तपासणी झाली असून सर्वाधिक 783 रुग्ण नेर तालुक्यातील, 613 रुग्ण पुसद तालुक्यातील, 431 रुग्ण महागाव तालुक्यातील, 429 दारव्हा तालुक्यातील आणि 328 रुग्ण उमरखेड तालुक्यातील आहेत. याव्यतिरिक्त उर्वरीत तालुक्यातील नागरिकांचीसुध्दा रोज तपासणी होत असून आतापर्यंत तापाचे 56 रुग्ण, खोकल्याचे 40 रुग्ण, श्वसनाचा त्रास 0, व इतर लक्षणे असलेले 101 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 134 नागरिकांना त्वरीत उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web