पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट

प्रतिनिधी .

चंद्रपूर – अत्यंत अल्प कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुसज्ज असे कोरोना कोविड रुग्णालय उभारण्यात आले असून आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक व भविष्यकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने तसेच नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक सोयी, सुविधा व सेवा सुलभरीतीने मिळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्थापन करण्यात आला आहे.

कोरोना संसर्गजन्य रोगाने सर्वत्र थैमान घातले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सद्यपरिस्थितीत कोरोनाचे 21 रुग्ण असून त्याची बाधा कोणाला होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन स्तरावरून योग्य ती खबरदारी घेतल्या जात आहे. दरम्यान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन कोरोनाच्या अनुषंगाने पाहणी केली. यावेळी योग्य त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.

यावेळी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जितेश सुरवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत उपस्थित होते.

या नियंत्रण कक्षामध्ये 9 कक्ष स्थापन करण्यात आले असून विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी 24 तास सेवा देत आहेत. यामध्ये कोरोना नियंत्रण कक्ष, जिल्हा आरोग्य अलगीकरण पथक, जिल्हा कोरोना अहवाल व नोंदवह्या पथक, कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाही कृतीदल, संपर्क संवाद व आकस्मिक उपाययोजना व मदत पथक, प्रशासकीय नियंत्रण पथक, जिल्हा सर्वेक्षण पथक अशा प्रकारची विविध पथके तयार करून जिल्हा प्रशासन कोरोना लढण्यास सज्ज झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटवून देत कार्यालयातील कामकाज केले जात आहे. पालकमंत्र्यांनी नियंत्रण कक्षाची पाहणी करून काम करीत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक सुद्धा केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web