आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक

प्रतिनिधी .

मुंबई – सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करावे तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ते आज आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेत होते.या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता,  सर्व विभागीय आयुक्त, रेल्वे, नौदल, लष्कर, हवाई दल, तटरक्षक दल, हवामान विभागाचे  तसेच मुंबई पालिका आयुक्त व  इतर अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले की, हवामानाचा अंदाज सांगायला कुठल्याही भोलानाथाची गरज नाही इतके आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे मात्र तरी देखील पाऊस आपले अंदाज चुकवतोच. अचानक कमी दाबाचा पट्टा तयार होणे, त्यामुळे वादळ, जोरदार पाऊस, ढग फुटी असे काहीही होऊ शकते, त्यामुळे सर्व विभागांनी हवामान विभागाच्या कायम संपर्कात राहावे व चांगला समन्वय ठेवावा.ज्याप्रमाणे विमान वाहतुकीच्या वेळी हवामानाविषयी खात्री करून घेता येते त्याप्रमाणे रेल्वेने देखील पुढील मार्गातील हवामानाचा अंदाज पाहून  रेल्वे गाड्यांचे नियोजन करावे. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस भर पावसात बदलापूरजवळ अडकली होती त्याचा संदर्भ त्यांनी दिला.आपण आपत्तीत बचावकार्य करणार आहोत पण सध्या कोविड परिस्थितीमुळे सावधानता बाळगावी लागणार आहे. यादृष्टीने आवश्यक ती संरक्षण साधने व किट्स. मास्क उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

ल्या वर्षीप्रमाणे सांगली – कोल्हापूरला पुराची पुनरावृत्ती नको

गेल्या वर्षीप्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये म्हणून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व अलमट्टी धरणातील पाण्याबाबत तेथील विभागाशी आत्तापासून समन्वय ठेवावा अशा सूचनाही त्यांनी केल्या

कोणत्याही परिस्थितीत खड्डे नकोत

मुंबईत २००५ च्या पुरानंतर आपण अधिक काळजीपूर्वक व सुविधांनिशी काम करू लागलो. नालेसफाई, त्यांचे  खोलीकरण, वेळीच पाणी निचरा होणे हे महत्त्वाचे आहे. पंपिंग स्टेशन व्यवस्थित चालली पाहिजेत. पाण्याचा निचरा करणारे  तेथील पाईप्स मोकळे आहेत का ते पहायला पाहिजे. शहरी असो किंवा ग्रामीण भाग पण कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडू न देणे आणि पडले तर तात्काळ बुजविणे महत्त्वाचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. दुर्गम भागात पावसाळ्यात अन्नधान्य, औषधी पुरवठा व्यवस्थित झालेला आहे का हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

विभागवार, जिल्हावार बैठका घेऊन व त्यात सबंधित डॉक्टर्सना सहभागी करून घेऊन पावसाळ्यातील रोगांसाठी चांगले नियोजन करण्यास त्यांनी सांगितले. अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात कोविडसाठी विलगीकरण सुविधा केल्याने एनडीआरएफला पर्यायी जागा लगेच द्या, असे निर्देश त्यांनी दिले. स्थानिक पातळीवर माजी सैनिकांना सहभागी करून घेतल्यास भारतीय लष्कर आणि प्रशासनात चांगला समन्वय राहील असेही ते म्हणाले.

मेघदूत आणि उमंग मोबाईल एप

भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक के एल होसाळीकर यांनी यावेळी सादरीकरण करून सांगितले की, राज्यात पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असेल.  १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव पडणार नाही. ज्यामुळे गेल्या वर्षी उत्तरार्धात भरपूर पाऊस झाला तो इंडियन ओशन डायपोल देखील अनुकूल आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. सर्वसाधारणरित्या महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येईल आणि  नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून ८ ऑक्टोबर रोजी त्याच्या परतीचा प्रवास सुरु होईल. गेल्यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला होता असे ते म्हणाले.

मुंबईतील हवामान विभागाचे संपर्क

मुंबईतील हवामान विभाग मुंबई पालिकेच्या समन्वयाने काम करीत आहोत. मुंबई तुंबते त्यासाठी पूर इशारा यंत्रणा विकसित केली आहे. प्रभाग पातळीवर किती पाऊस पडून पाणी पातळी किती वाढू शकते याची वेळीच माहिती मिळते . १४० पर्जन्यमापन केंद्रे सध्या असून शेतकऱ्यांसाठी मेघदूत मोबाईल एप आहे तसेच उमंग मोबाईल एपवर देखील रिअल टाईम माहिती मिळू शकेल असे ते म्हणाले.

मुंबईतील हवामान विभागाचे संपर्क क्रमांक ०२२-२२१५०४३१/ ०२२- २२१७४७१९ आणि ईमेल acwc.mumbai@gmail.com असे आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web