पुणे विभागातून १ लाख ८८ हजार ५७० प्रवाशांना घेऊन १४१ विशेष रेल्वेगाड्या रवाना

प्रतिनिधी .

पुणे – महाराष्ट्रातून देशाच्या विविध राज्यांमध्ये परतणाऱ्या मजूर, कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा आज विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी घेतला. पुणे विभागात सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली असून यापुढेही ज्या मजूर, कामगार यांना आपल्या गावी जाण्याची इच्छा असेल अशा परराज्यात परतणाऱ्या मजुरांच्या रेल्वे वाहतूक व्यवस्थेचे नियोजन सुरळित व समन्वयाने करा अशा सूचानाही  डॉ. म्हैसेकर यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात परराज्यात परतणाऱ्या मजुरांच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन व समन्वयासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आढावा घेतला. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ  व्यवस्थापक सुनील मिश्रा,पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ,  रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा ,सहर्ष वाजपेयी,  उपायुक्त दीपक नलावडे, विभागीय   सुरक्षा आयुक्त श्री. त्रिपाठी आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले,  लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार व इतर राज्यामधील 1 लाख 88 हजार  570 मजुरांना घेऊन पुणे विभागातून 141 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्या आहेत.  परराज्यातील अडकलेल्या मजूर, कामगार व श्रमिकांची पाठवणी त्यांच्या त्यांच्या राज्यात सुरु आहे. पुणे विभागातून यासाठी विशेष रेल्वे रवाना झाल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातील कक्षाद्वारे या सगळ्यावर देखरेख व समन्वय ठेवण्यात येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, छत्तीसगड अशा राज्यातील मजूर मोठ्या संख्येने आहेत. मजुरांची शासनाने त्यांना निवारा देऊन तसेच जेवणाखाण्याची व्यवस्था केली. तसेच जोपर्यंत सर्वजण आपापल्या ठिकाणी जात नाहीत तोपर्यंत ती व्यवस्था आजही सुरूच आहे. पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यातील किती मजुरांनी गावाकडे जाण्याची मागणी केली आहे त्याप्रमाणे रेल्वेगाडयांचे नियोजन करा, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यातील समन्वय अधिकारी यांनी मजूरांच वाहतूक व्यवस्थेचे अत्यंत बारकाईने नियोजन करावे तसेच या श्रमिकांना पाठविताना सुरक्षित अंतर ठेऊन पाठविण्यात यावे. मजूरांना मास्क, जेवण, पाणी यासह आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात असे सांगून पुणे विभागातून परराज्यात परतणाऱ्या मजुरांबाबतचा जिल्हानिहाय आढावा घेतला. यामध्ये रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या पातळीवर सुरू असलेले नियोजन, समन्वय अधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवरील नियोजन व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागामार्फत सुरू असलेल्या नियोजनबाबत माहिती देण्यात आली. बैठकीला महसूल, पोलीस व रेल्वे विभागाचे सबंधित अधिकारी उपस्थित होते.   

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web