कोरोना वर मात करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर अकोला महापालिकेत अतिरिक्त सनदी अधिकारी नेमा – राजेंद्र पातोडे.

प्रतिनिधी .

अकोला दि. २३ – कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत तीन सनदी अधिकारी ह्यांना अतिरिक्त आयुक्त व सहायक आयुक्त म्हणून नेमणूक देण्यात आली आहे, त्याच पध्दतीने अकोला महापालिका क्षेत्रात सर्व शहरात सापडत असलेले रूग्ण पाहता अकोला महापालिकेत अतिरिक्त सनदी अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना ईमेल व्दारे केली आहे.
अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा ३८७ वर पोहचला आहे.त्यामध्ये सर्वाधिक रूग्ण अकोला महापालिका भागातील आहेत.विशेष म्हणजे शहरातील बहुतांश भागात रूग्ण सापडत आहेत.त्यामुळे अकोला महापालिका रेड झोन मध्ये आहे.ह्यावर मात करण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे.जिल्हा व महापालिका प्रशासनात समन्वय नसल्याने शहरातील ही परिस्थिती दिवसागणिक अधिक बिकट बनली आहे.५० दिवसापेक्षा जास्त संचारबंदी आहे, तरीही परिस्थिती नियंत्रित करणे शक्य झाले नाही.
कोरोना रूग्ण वाढीच्या अशाच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी रणजित कुमार ह्या सनदी अधिका-याची तात्पुरती नियुक्ती केली आहे.त्यापुर्वी संजय हेरवडे व गणेश देशमुख ह्यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.पुणे महापालिका करीता देखील काही अधिकारी नेमण्यात आले आहे.
ह्याचीच गरज अकोला महापालिका मध्ये आहे.लॉकडाऊन च्या काळात वाढणारे रूग्ण व पुढे येणारा पावसाचे दिवस पाहता परिस्थिती अधिक गंभीर होईल.महापालिकेत अधिकारी कमी अाहेत.सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी ह्यांना कीट, मास्क ही उपकरणे पुरविण्यात आली नाही.अवैध पध्दतीने टाकलेल्या टेलिकॉम कंपनीच्या तोडलेल्या केबल दुरूस्तीच्या नावाने जोडण्यात आल्या आहेत.परंतु त्याला पायबंद घालण्यात आला नाही.ह्याचा अर्थ महापालिका प्रशासन शहरातील परिस्थिती हाताळण्यात पुर्ण अपयशी ठरत असल्याने महापालिका क्षेत्र कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे.त्यासाठी अकोला महापालिका क्षेत्रात अतिरिक्त सनदी अधिकारी नेमणूक करण्यात यावा, अशी मागणी देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web