स्वदेस फाउंडेशन तर्फे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत पाणी प्रकल्पाच्या कामांना सुरुवात

प्रतिनिधी .

अलिबाग – लॉकडाऊन मध्ये पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी प्रकल्प राबवण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्वदेस फाउंडेशन ला विशेष परवानगी दिल्यानंतर, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव, तळा व सुधागड या सात तालुक्यांमधील पाणी प्रकल्पाची कामे सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत सुरू करण्यात आलेली आहेत.
या कामांमध्ये प्रामुख्याने पाण्याचे उद्भवाचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे व हे करीत असताना सध्याची करोना पार्श्वभूमी लक्षात घेऊन काम करताना योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, ज्यामध्ये 1) दिवसातून तीन वेळा कामगारांचे थर्मल स्कॅनिंग केले जाते 2) कामगारांना मास्क वापरणे बंधनकारक आहे 3) काम करत असताना सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे 4) ठराविक काळानंतर प्रत्येक कामगाराने हात धुणे किंवा सॅनिटायजर वापरणे बंधनकारक आहे. अशा प्रकारची काळजी घेऊन सात तालुक्यामधील 21 ठिकाणी पाणी प्रकल्पाची कामे सुरू असून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त पाणी योजना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याचा प्रशासनाच्या सहकार्याने स्वदेस फाऊंडेशनचा प्रयत्न आहे.
तसेच स्वदेस फाउंडेशनने जिल्हा परिषदेच्या 100 हून अधिक शाळांमध्ये शौचालय व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थेचे चांगले काम केल्यामुळे सद्य परिस्थितीत पुणे मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांना अलगीकरण करण्यासाठी या शाळांचा चांगला उपयोग झाला आहे. स्वदेस फाऊंडेशनचे प्रमुख रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला व मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्राम विकास समितीच्या पुढाकाराने तुषार इनामदार यांच्या देखरेखीखाली सर्व प्रकल्प यशस्वी होत आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web