कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश शहरात कंटेनमेंट झोन व परिसरासाठी पथके नियुक्त

प्रतिनिधी .

अमरावती – अमरावती शहरात कोरोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता कोरोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. त्यानुसार महापालिकेकडून कंटेनमेंट व इतर परिसरासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
सद्यःस्थितीत कोविड -19 या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात, विशेषत: अमरावती शहरात वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेकडून इतर यंत्रणांच्या सहकार्याने सूक्ष्म नियोजन होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन दिले होते. त्यानुसार जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार महापालिका व इतर यंत्रणांच्या शहरात विविध ठिकाणी पथके निर्माण करण्यात आली आहेत.
आपत्ती लक्षात घेता महानगरपालिका व इतर यंत्रणांमार्फत विविध प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍यात येत आहेत. तथापि, परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन केल्यास अधिक प्रभावीपणे काम करणे शक्य होईल, या हेतूने पालकमंत्री श्रीमती ठाकूर व जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी परिसरनिहाय ठिकठिकाणी स्वतंत्र पथके निर्माण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथके निर्माण करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.
कंटेनमेंट झोनमध्ये ‍पोलीस विभाग व महानगरपालिका यांच्या समन्वयाने कंटेनमेंट क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी व अत्यावश्यक सुविधा पुरविण्याकरिता पथके काम करतील. संशयित नागरिकांवर लक्ष व कंटेनमेंट झोनच्या बाहेर निघू न देणे तसेच बाहेरच्या व्यक्तींना आतमध्ये प्रवेश न देणे, आरोग्य सुविधा, सर्वेक्षण, हाय रिस्‍क व लो रिस्‍क संपर्कातील व्‍यक्‍तींना क्‍वॉरंटाईनसाठी सहकार्य करणे, आजाराचा फैलाव रोखण्‍याकरीता प्रयत्‍न करणे आदी बाबी हाताळण्‍याकरिता पथक तयार करण्‍यात आले आहे. पथकांना त्यांच्या क्षेत्रात कार्यवाही सुरु करण्‍याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आयुक्त श्री. रोडे यांनी दिली.
महापालिकेचे सहायक क्षेत्रीय अधिकारी हे पथकाचे प्रमुख असून, त्यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्यासह विविध कर्मचा-यांचा समावेश करण्यात आला आहे. हैदरपुरा, हाथीपुरा, खोलापुरी गेट, नागपुरीगेट, चेतनदास बगीचा,रतनगंज, झोपडपटटी, पिंजारीपुरा, बच्छराजप्लॉट, मसानगंज, पटवा चौक, कंवर नगर,बापु कॉलनी, सिंधुनगर, पॅराडाईज कॉलनी, बंजरंग टेकडी मसानगंज अमरावती, खुर्शीदपुरा, वडाळी यासह विविध परिसरात नागरी आरोग्य केंद्राच्या स्तरावर ही पथके काम करतील.या परिसरात तपासण्यांना वेग देण्याचे व आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web