प्रतिनिधी.
रत्नागिरी – येणाऱ्या पावसाळयाच्या कालावधीत रस्ते वाहतूक सुरळीत राहिल या दृष्टिकोणातून नियोजन करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत. पावसाळापूर्वीच्या आपत्ती आराखड्याचा आढावा जिल्हाधिकारी मिश्रा यांनी घेतला.
या आढावा बैठकीस अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुळकर्णी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सुर्यवंशी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हयात पावसाळयात निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये नद्यांना येणाऱ्या पूराचा व दरडी कोसळण्याच्या घटनांचा प्रामुख्याने समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ज्या ठिकाणी पूल आहेत त्या ठिकाणी पूरस्थितीत करायच्या वाहतूक नियंत्रणाबाबत यावेळी चर्चा झाली.
रस्त्याच्या रुंदीकरण कामामुळे अनेक ठिकाणी मातीचे भराव रस्त्याच्या बाजूला उभे करण्यात आलेले आहेत. हे भराव पावसाने वाहून रस्त्यांवर येणे आणि त्यामुळे चिखल होवून वाहतूकीला अडथळा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संबधित कंत्राटदारांनी पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना त्यांना देण्यात याव्यात व विनाखंड वाहतूक सुरु राहील याकडे लक्ष द्यावे असे जिल्हाधिकारी म्हणाले.
परशुराम घाटात दरडी कोसळल्याने गेल्या वर्षी वाहतूक खोळंबली होती. यासह कुंभार्ली घाट तसेच कशेडी घाट आणि आंबा घाट यासर्व ठिकाणी वाहतूक सुरळीत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसासोबत खरीप हंगामातील पेरणीला आंरभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा पुरवठा वेळेत होईल याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिल्या.
यंत्रणा तयार करा
जिल्हा भूंकप प्रवण क्षेत्रात समाविष्ट झाल्याच्या सूचना 3 वर्षांपूर्वी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हयात भूकंपमापन यंत्रणा स्थापन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोणातून आवश्यक यंत्रांची खरेदी करुन त्या यंत्रणेला भारतीय हवामान खात्याशी संलग्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हयातील राजापूर तसेच चिपळूण आणि खेड शहरात अनेकदा पाणी शिरते. या ठिकाणांवर नागरिकांच्या सुविधेसाठी असणाऱ्या बोटीची खरेदी देखील करण्यात यावी असे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.
गेल्या वर्षी तिवरेची दुर्घटना घडली होती. त्यामुळे यंदा पावसाळयापूर्वी सर्व धरणांची पुन्हा क्षमता तपासणी व योग्य ती दुरुस्ती करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.