ठाणे जिल्ह्यातील आजअखेर पर्यत ५६ हजार मजुर मूळगावी रवाना

प्रतिनिधी .

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, ओरिसा, झारखंड या राज्यांमध्ये आतापर्यंत २१ हजार ४७५ स्थलांतरित मजुरांना १७ ट्रेनमधून तर १५५३ बसेस मधुन ३४ हजार ४८५ जण असे आज अखेरपर्यंत ५६ हजार मजुर त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

लॉकडाऊन झाल्याने रोजगार गमावलेल्या कामगारांचे आपापल्या राज्यात परतण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पायी, तसेच मिळेल त्या वाहनातून आपल्या गावी परतण्याचे प्रयत्न हे मजुर करीत. आहेत. जिल्हा प्रशासनाने या मजुरांची यादी तयार करुन त्यांना रेल्वेने घरी पोहोचविण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. तसेच पायी चालणाऱ्या मजुरांना एका ठिकाणी थांबवुन एसटी बसेस ने रवाना करण्यात आले. राज्य सरकार आणि रेल्वेमंत्रालयाने वाहतुकीची विशेष व्यवस्था केल्याने या मजुरांनी आपल्या घराची वाट धरली आहे.

ठाणे जिल्ह्यातुन उत्तर प्रदेशसाठी २ रेल्वेने २८३३मजुर, बिहार साठी ८ रेल्वेने १०६३२ मजुर , मध्यप्रदेशसाठी २ रेल्वे ने १६५२ मजुर, राजस्थानसाठी ३ रेल्वेने ३४९४ मजुर रवाना झाले आहेत. ओरिसा राज्यासाठी १ रेल्वेने १३६४, झारखंडसाठी १ रेल्वेने १५०० मजुर रवाना करण्यात आले आहेत. आज अखेर पर्यत ठाणे जिल्हा प्रशासनाकडे रेल्वेने घरी जाण्यासाठी ६५ हजार पेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली आहे. संबंधित राज्यांशी समन्वय साधुन त्यांची परवानगी मिळाल्यानंतर रेल्वेचे नियोजन करण्यात येत आहे.

मुंबईतील ठाणे मार्गे अनेक मजूर उत्तर भारतात जात आहेत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, माजिवाडा, तीन हात नाका, आदी पिकअप पॉइंटवरून मजुरांना सोडण्यासाठी बसेस सोडण्यात येत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच त्यांना सोडण्यात येत आहे.
या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी पोलीस आणि महसूल विभाग समन्वय साधत आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील हे सर्व नियोजन करीत आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web