कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय – उपमुख्यमंत्री

प्रतिनिधी .पुणे, १५ – कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके,माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील, राजाभाऊ चोपदार, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, माणिक मोरे,संजय मोरे, सोपानदेव देवस्थानचे विश्वस्त तथा अध्यक्ष गोपाळ गोसावी, मनोज रणवरे, श्रीकांत गोसावी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून व  विश्वासात घेवूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे, याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व  संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखी सोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सोलापूर, सातारा व पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळयाबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत. राज्य मंत्रीमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार असून त्यांनतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री पवार यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी  शासनाची नियमावली, लॉकडाऊन स्थिती व सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळयाचे स्वरूप कशा प्रकारे करावे,या बाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल, तसेच शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असे  श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे यांनी सांगितले. सातारा जिल्हयाचे पालकमंत्री  बाळासाहेब पाटील व सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीमध्ये पालखी सोहळयाचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग,प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळयाच्या आयोजनाबाबतचे पर्याय, पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या  प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील  मान्यवर उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web