नवी मुंबईतील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये तात्पुरते कोव्हीड रुग्णालय

प्रतिनिधी.

नवी मुंबई – वाशी येथील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये करोना विरुद्धच्या लढ्यासाठी तात्पुरते काव्हिड रुग्णालय उभारण्याचा निर्णय नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या रुग्णालयाची उभारणी होणार असून तब्बल ११०० बेड्सच्या या रुग्णालयात डायलिसिस सेंटर, लॅब, ऑक्सिजन, एक्स रे अशा सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास वैद्यकीय क्षमता अपुरी पडू नये यासाठी अनेक ठिकाणी तात्पुरती रुग्णालये उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात १००० बेड्सचे रुग्णालय उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून ठाण्यातही १००० बेड्सचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता नवी मुंबईतही अशा प्रकारचे, ११०० बेड्सचे रुग्णालय उभारण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिले आहेत. श्री. शिंदे यांनी गुरुवारी नवी मुंबईत आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी हे निर्देश दिले.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील या रुग्णालयांमुळे करोनाविरुद्धच्या लढ्याला मोठे बळ मिळेल, तसेच संपूर्ण एमएमआर परिसरात आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web