कामगारांमध्ये भेदभाव नको, नियमित सर्वांना प्रोत्साहन भत्ता द्या – प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी.

पुणे दि. २ – मनपाच्या कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच कंत्राटी आणि स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, कामगारांमध्ये भेदभाव करण्यात येऊ नये, याबाबत शासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
मुंबईसह देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई रेड झोन मध्ये आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत असले तरी मुंबई मनपाचे आपत्कालीन कर्मचारी जीवावर उदार होऊन लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहे. हे कर्मचारी आपल्याला २४ तास पाणी, विज मिळावी यासाठी कर्तव्यावर आहे. तर शहरात कचऱ्याची, सांडपाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून चतुर्थ श्रेणी कामगार आपले कर्तव्य बजावत आहे. अशा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना कोरोना काळात प्रोत्साहन भत्ता दिला जातो. त्यासाठी संघटना आणि सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत केलेली आहे. तरीही कायमस्वरूपी कामगार सोडल्यास कंत्राटी आणि स्वयंसेवी संस्थेच्या कामगारांना प्रोत्साहन भत्ता दिला जात नाही. त्यांच्यात भेदभाव केला जातो. याबाबत अनेक कामगारांच्या तक्रारी आलेल्या आहेत. सर्वांचे काम समान असूनही समान वेतन नाही, प्रोत्साहन भत्ता नाही हा त्यांच्यावर अन्याय असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा भेदभाव दूर करून कोरोना काळात नियमित प्रोत्साहन भत्ता त्यांना देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web