कोरोनाच्या अनुषंगाने केन्द्रीय पथकाने घेतला ठाणे जिल्ह्याचा आढावा

प्रतिनिधी.

ठाणे ,दि.२५- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यात यावा. जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा सुचना केंद्रीय पथकाचे प्रमुख अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांनी केल्या.वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केन्द्रीय स्तरावरील पथक ठाणे जिल्ह्यात आले आहे. या केंद्रीय पथकाने सकाळी कौशल्य हॅस्पीटल, जिल्हा सामान्य रूग्णालय, होरायझन हॅस्पीटल या कोव्हीड हॅास्पीटल्सना तसेच पारसिक नगर कळवा, अमृतनगर, मुंब्रा या ठिकाणी भेट घेवून परिस्थितीचा आढावा घेतला.केंद्रीय मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे मनपाच्या बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीत कोविड १९ ची वाढती संख्या, साथरोगा प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा घेतला.यावेळी बोलतांना श्री जोशी म्हणाले सर्व विभाग समन्‍वयाने काम करीत आहेत, ही समाधानाची बाब असली तरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जास्तीत जास्त संशयितांची तपासणी करण्यात यावी. प्रत्येक क्षेत्रातील फिवर क्लिनिकच्या ठिकाणी योग्य ती दक्षता घेण्यात यावी. तसेच संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा. विशेषत: झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेण्यात यावी अशा सुचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच कोव्हीड आणि नॉन कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात यावी. कोविड व्यतिरिक्त ईतर रुग्णांना देखील उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करावे अशा सुचना त्यांनी यावेळी केल्या.

प्रत्येक मनपाने आपल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व ठिकाणी अन्‍न–धान्‍याचे वितरण व्‍यवस्थित करावे आणि नागरिकांमध्‍ये असलेली भिती घालवुन विश्‍वास निर्माण करावा, असे श्री जोशी यांनी सांगितले.प्रारंभी ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघल यांनी ठाणे महानगर पालिकेची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. ठाणे शहरात प्रमाण अधिक असलेल्या भागाची लोकसंख्या आणि इतर कारण यांवर माहिती दिली. प्रशासनाने अगदी सुरूवातीपासूनच खबरदारी व दक्षता घेतली आहे. मनपाने अतिशय सुक्ष्म नियोजन केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरातील सर्व रुग्णालये सक्षम केली आहेत. विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावीपणे सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले

ठाणे जिल्ह्यात आरोग्य, पोलिस, महसुल प्रशासन हे संयुक्तपणे काम करीत आहे.सर्व महानगरपालिका तसेच हॉस्पिटलमध्ये पुरेश्या प्रमाणात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार सुविधांची उपलब्धता करुन देण्यात येत असल्याचे कोकण विभागीय आयुक्त श्री शिवाजीराव दौंड यांनी सांगितले.पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस करीत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. तसेच लोकांमध्ये जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपपक्रमांबद्दलही सांगितले.

नवी मुंबई पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी वाशी येथिल एपीएमसी मार्केट आणि उद्योग व आय.टी.कंपन्या मोठ्या प्रमाणात या भागामाध्ये असल्याने पोलिस यंत्रणेमार्फत कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात येत उपाययोजनांविषयी माहिती दिली.नवी मुंबई मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ,कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी,मिरा भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मनपांनी केलेल्या उपाययोजना व जनजागृती तसेच वैद्यकीय सुविधा यांची माहिती दिली.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या कम्युनिटी किचनची व अडकून पडलेल्या मजूर व कामगारांची निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासन व विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. सर्व नागरिकांना अन्न धान्य वेळेवर उपलब्ध व्हावे यासाठी नियोजन करण्यात आले आहे. स्वस्त धान्य दुकानांमार्फत सर्वांपर्यत रेशन पोहोचविण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होणार यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही श्री नार्वेकर यांनी सांगितले.या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मनपांचे वैद्यकीय आधिकारी, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web