बोट बुडाली पण,पोलिसाच्या कार्यतत्परतेमुळे वाचले ८८ प्राण

प्रतिनिधी रायगड -आज सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास गेट वे ते मांडवा जेट्टी या दरम्यान चालणारी अजंठा प्रवासी बोट ८८ प्रवाशी घेऊन मांडवा जेट्टीपासून काही किलोमीटर अंतरावर असताना अचानक बुडू लागल्याने बोटीवरील प्रवास करणारे पुरुष, महिला व लहान मुले यांनी घाबरून आरडाओरड चालू केला असता सागरी गस्तीवर निघालेल्या रायगड जिल्हा पोलीस दलातील सद्गुरू कृपा बोटी वरील नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी पो. ना बक्कल न. ८९१ श्री प्रशांत घरत यांनी ट्रॉलर वरील तांडेल व खलाशी यांचे मदतीने बुडणाऱ्या प्रवाशी बोटींजवळ त्वरित पोहचून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता अत्यन्त सावधगिरीने त्यावरील ८८ पुरुष, महिला व बालके यांचा जीव वाचवून त्यांना पोलीस गस्तीवरील नौकेच्या सहाय्याने जेट्टीवर सुखरूप आणले.

  सदर दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसुन सुटका झालेल्या सर्व प्रवाशी यांनी व पोलीस अधीक्षक रायगड यांनी पोलीस कर्मचारी घरत यांची कार्यतत्परता, निर्णय क्षमता व धाडसाचे कौतुक केले आहे. आज प्रशांत घरत याच्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सर्व प्रवाशांना मदत केली. तर बोट काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अजंठा या बोटसेवा देणाऱ्या कंपनीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे धर्मराज सोनके यांनी सांगितले.

 बोटीची क्षमता ५०ते ६० प्रवाशांची असतानाही जास्त प्रवाशी कसे बोटीत घेतले गेले.याची चौकशी होणे महत्वाचे आहे.बोट सेवा देणाऱ्या कंपन्या प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचं आजच्या घटनेत दिसून आलं आहे. तरी सरकारने योग्य ती कारवाई करून लक्ष देण्याची गरज आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web