केमिकल कंपन्यांनी सुरक्षा उपकरणं लावा अन्यथा टाळे ठोका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले असून या कंपन्यांनी एकतर सुरक्षा उपकरणे लावा नाहीतर मग टाळे ठोका असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केमिकल कंपन्यांना आज दिला. डोंबिवलीमध्ये रासायनिक प्रदूषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी करून झाल्यावर केडीएमसीमध्ये सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दम भरला.
डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक प्रदूषणाबाबत 3 टप्प्यात कार्यवाही आणि कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शासनाच्या यंत्रणा कारखान्यांची तपासणी करून जी सुरक्षा उपकरणे लावण्यास सांगतील ती संबंधित कंपन्यांनी लावावी. ही उपकरणे लावायची की कंपनीला कुलूप लावायचे हा निर्णय कंपनी मालकांनी घ्यावा असे आदेश आपण दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तर दुसऱ्या टप्प्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे घातक केमिकल वाहून जाण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे आणि तिसऱ्या टप्प्यात घातक केमिकल कंपन्या नागरी वस्तीच्या बाहेर हलवण्यात येणार आहेत. त्यासाठी आपण 15 दिवसांची मुदत दिली असून त्या कंपन्या कोणत्या? त्यांना कुठे जागा द्यायची? कोणाला कुठे हलवायचं याबाबतही आवश्यकतेनुसार निर्णय घेतले जाणार असल्याचे ते म्हणाले.
कल्याण डोंबिवलीसाठी 100 कोटी रुपयांचा निधी जाहीर…
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आम्ही काही वचनं दिली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी महापालिकेला 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हे 100 कोटी रुपये कसे वापरले जातात त्याची तपासणी करून मग पुढील निधी दिला जाणार आहे. इथल्या नागरिकांना आपण एका चांगल्या शहरात राहत असल्याचा अभिमान वाटेल असे शहर निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांच्याबरोबर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web