मुंबई खास मुंबई 24 तास

मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकणाऱ्या महत्वाकांक्षी अशा ‘मुंबई 24 तास’ संकल्पनेला आता मूर्त स्वरुप प्राप्त होत आहे. या संकल्पनेबाबत पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ सदस्यांना माहिती दिली. याविषयावर चर्चा झाली. त्यानंतर आता येत्या 27 जानेवारीपासून मुंबईत हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरे आणि गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, येत्या 27 जानेवारीपासून ‘मुंबई 24 तास’ संकल्पना प्रत्यक्षात सुरु होणार आहे. यातून नवीन रोजगार निर्मिती आणि मुंबईच्या पर्यटन विकासाचे ध्येय आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर मॉल्स, गेटेड कंपाउंड, बीकेसीमधील एक लेन, नरीमन पॉइन्टमधील एक लेन अशा ठराविक भागात हा उपक्रम सुरु होणार आहे. बिगरनिवासी भागातच हा उपक्रम राबविला जाईल. सुरक्षेच्या उपाययोजना, पार्कींग, कामगार कायदे, अन्न सुरक्षा, अग्नि सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन आदी सर्व नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, दुकाने आणि आस्थापना कायद्यामध्ये 2017 मध्येच सुधारणा झाली. पण त्यावेळी त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता ‘मुंबई २४ तास’च्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुरु होत आहे. लंडन येथील नाईट इकॉनॉमी ही जवळपास 5 बिलीयन पाउंडची आहे. ‘मुंबई 24 तास’ उपक्रमामुळे व्यवसाय, उद्योग, पर्यटन आणि रोजगार वाढल्याने येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
एक्साईज संदर्भातील कायद्यामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे पब, बार इत्यादी सध्या प्रचलीत नियमानुसार व सध्या निश्चित असलेल्या वेळेतच सुरु राहतील. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. इथे रात्री येणाऱ्या पर्यटकांना ‘मुंबई 24 तास’मुळे सुविधा उपलब्ध होतील. ‘मुंबई 24 तास’मुळे विविध आस्थापना 3 पाळ्यांमध्ये (3 शिफ्टमध्ये) सुरु राहतील. त्यामुळे रोजगारात 3 पट वाढ होईल, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web