NRC,CAA निषेधार्थ २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद ची हाक: प्रकाश आंबेडकराची घोषणा

मुंबईः मोदी सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) तसेच देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने येत्या 24 जानेवारीला (शुक्रवारी) मुंबईबरोबरच महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दादरच्या आंबेडकर भवनात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीनंतर आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सीएए आणि एनआरसीविरोधात देशात प्रचंड रोष आहे. मोदी सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पहात आहे. जीएसटी, नोटबंदी आणि अविश्वानसाचे वातावरण यामुळे गुंतवणूक येईनाशी झाली आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली असून देशाची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू आहे. या सर्व गोष्टींना मोदी सरकारच जबाबदार असून त्याचा निषेध नोंदवण्यासाठीच महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. या बंदमध्ये महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनीही सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या ज्या संघटनांनी सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलने केली, त्या सर्वांनाच वंचित बहुजन आघाडीने आजच्या बैठकीला निमंत्रित केले होते. त्याला प्रतिसाद देत आजच्या बैठकीला 35 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सीएए- एनआरसीबरोबरच देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरही आवाज उठवणे गरजेचे असल्याचे सर्वांचेच मत होते. त्यानुसार मुंबईसह महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web