मुंबईः राज्यातील सर्वसामान्यांच्या उपचारासाठी महत्वाच्या ठरलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. आता राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एक रुग्णालय या योजनेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे.अधिकाधिक रुग्णांना योजनेचा फायदा मिळावा म्हणून राज्यभरात या योजनेत सहभागी रुग्णालयांची संख्या वाढवून दुप्पट म्हणजेच सुमारे एक हजार करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सर्वसामान्य रुग्णांना खर्चिक उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. या योजनेत सहभागी रुग्णालयांची संख्या वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यामुळे रुग्णालयांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार असून येत्या पंधरा दिवसांत याबाबतचा शासन निर्णय जारी होईल, असे टोपे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर सांगितले.
सध्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील 355 तालुक्यांपैकी केवळ 100 तालुक्यांचा अंतर्भाव आहे. योजनेत सहभागी रुग्णालयांची संख्याही 492 आहे. या योजनेत समाविष्ट नसलेल्या तालुक्यांतील रुग्णांना नजिकच्या तालुक्यात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागतात. प्रत्येक रुग्णाला त्याच्याच तालुक्यात उपचार मिळावे म्हणून या योजनेत प्रत्येक तालुक्यातील किमान एक रुग्णालय समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक धर्तीवर राज्यात हेल्थ वेलनेस सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. या हेल्थ वेलनेस सेंटरच्या माध्यमातून प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. मोहल्ला क्लिनिकच्या अभ्यासासाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीला भेट देतील, असेही टोपे यांनी सांगितले.